
सातानकुलम कस्टोडियल डेथ केस: पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा !
१९ जून २०२० रोजी कोरोना लॉकडाऊनच्या काळात तमिळनाडूमध्ये घडलेल्या एका हादरवून सोडणाऱ्या घटनेचा अखेर निकाल लागला आहे. केवळ १०-१५ मिनिटे दुकान उशिरा बंद केल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका पिता-पुत्राला बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला होता. या प्रकरणात न्यायालयाने आता तब्बल ९ आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
*या हादरवणाऱ्या प्रकरणाचे महत्त्वाचे मुद्दे:*
नेमकी घटना काय होती ?
तमिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील सातानकुलममध्ये पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त १०-१५ मिनिटे जास्त वेळ दुकान उघडे ठेवले होते. याच साध्या कारणावरून गस्तीवर असलेल्या पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून लॉकअपमध्ये टाकले आणि पोलीस स्टेशनच्या चार भिंतींच्या आड त्यांना अमानुषपणे टॉर्चर करत रात्रभर मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे आणि योग्य वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या दोन्ही पिता-पुत्रांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते.
*न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल:*
या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत न्यायालयाने ‘कस्टोडियल डेथ’ (पोलीस कोठडीतील मृत्यू) हा समाजावरील आणि लोकशाहीवरील कलंक असल्याचे स्पष्ट केले. या अमानुष कृत्यात सहभागी असलेल्या तब्बल ९ पोलिसांना न्यायालयाने थेट फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावली आहे.
*न्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण:*
ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांनीच कायदा हातात घेतल्यास त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही. सत्तेचा गैरवापर सहन केला जाणार नाही आणि कायद्याचा वापर संरक्षणासाठी व्हायला हवा, दडपशाहीसाठी नाही, असा कडक संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
संपादक – संतोष राजे.



