कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का?
नवी मुंबई प्रतिनिधी - सुनील गायकवाड.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने नाकारलेल्या पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी कशासाठी?
कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेला बऱ्या प्रमाणात नगरसेवक पदाच्या जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात यश मिळवून एक हाती सत्ता प्राप्त होण्याचे बळ मतदार राजाने मिळवून दिले यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आणि संच प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोलाचा असतो मात्र अशाच कार्यकर्त्यांना डावलून भारतीय जनता पार्टीने व शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे सामान्य कार्यकर्त्यांना महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सदस्य पद न दिल्याने कार्यकर्त्यांनी फक्त नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करावे का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ज्या पक्षांनी ज्यांच्या घरात अथवा स्वतःला उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असे उमेदवारांना जनतेने पूर्णपणे नाकारले असताना या पराभूत उमेदवारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सदस्य पदी विराजमान होणे कितपत योग्य आहे असा सवाल नागरिकांच्या वतीने राजकीय पक्षाच्या लोकांना आणि नेत्यांना विचारला जात आहे. नवी मुंबई घणसोली मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांची मुलगी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणुकीच्या रिंगणात उभी होती मात्र जनतेने दिला नाकारून भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले त्याच उमेदवाराच्या वडिलांना म्हणजेच द्वारकानाथ भोईर यांना शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे स्वीकृत नगरसेवक या पदासाठी त्यांची लॉटरी शिवसेनेने लावली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मीकांत पाटील यांना देखील भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती मात्र जनतेने लक्ष्मीकांत पाटील यांना देखील नाकारून त्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांच्या विरोधात उभा असलेला शिवसेनेचा संपूर्ण पॅनल निवडून दिला अशा उमेदवारांना जर जनतेने नाकारले आहे तर भारतीय जनता पार्टीने अथवा शिवसेनेच्या शिंदे गटाने या पराभूत उमेदवारांना महानगरपालिकेच्या दाराचे दरवाजे खुले करून नथीतून तीर मारला असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे ऐरोली विभागातील नगरसेवक विजय चौगुले, चांदणी चौगुले, ममित चौगुले, शुभम चौगुले, असे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे चार नगरसेवक एकाच घरातील निवडून आल्यानंतर देखील विजय चौगुले यांचे बंधू दिवंगत देविदास चौगुले यांचे सुपुत्र साहिल चौगुले यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी त्यांची निवड शिंदेच्या शिवसेनेने केलेली आहे जर एकाच घरात पाच नगरसेवक असतील तर त्या विभागातील कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या सतरंज्या उचलायचा का? अशी चर्चा देखील सुज्ञ नागरिकांच्या कडून होताना दिसत आहे. दिघा चिंचपाडा विभागातून भारतीय जनता पार्टीच्या पराभूत झालेल्या उमेदवार अपर्णा गवते यांना देखील भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान केलेले आहे त्याचप्रमाणे भरत नखाते, जगजीवन केणी, अमित मेढेकर, कुलदीप सुरी, यांना या राजकीय पक्षांनी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
दरम्यान : ऐरोली विधानसभा 150 विधानसभेची निवडणूक संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने लढणारे व सध्या शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई संपर्कप्रमुख असणारे अंकुश कदम यांना देखील स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे ऐरोली विभागाचे सुरेश भिलारे यांना देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाचे दरवाजे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने खुले केले आहेत.
प्रस्थापित पक्षाच्या राज्यकर्त्यांनी जर अशा बलाढ्य लोकांना निवडणुकीत पराभव होऊन देखील जर मागच्या दरवाजाने पुन्हा स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास जनतेने मतदानाच्या माध्यमातून दिलेला जो कौल आहे त्याला काही अर्थ राहील का? असा प्रश्न ज्या नागरिकांनी एखाद्या पक्षाला अथवा उमेदवाराला मतदान केलेले आहे अशा मतदार करणाऱ्या नागरिकाला नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही? ज्या उमेदवारांची वर्णी स्वीकृत नगरसेवक म्हणून लागलेली आहे ते राजकीय पक्षाच्या आखाड्यातले आहेत इतर क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान आहे का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
नवी मुंबई प्रतिनिधी – सुनील गायकवाड