पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या 3 महिन्याच्या बाळाची 24 तासांत सुटका; आरोपीता ताब्यात
तत्पर कारवाईत 5 पथक तयार; सीसीटीव्ही फुटेजमुळे शोध लागला

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरून 30 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 3.30 या दरम्यान 3 महिन्याच्या बाळाचे अचानक अपहरण झाल्याच्या गंभीर घटनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याने त्वरीत कारवाई केली. अपहरणाची नोंद गुन्हा BNS 137(2) (IPC 363) प्रमाणे करण्यात आली. या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाला तोंड देण्यासाठी पोलीसांनी तातडीने 5 पथक तयार केली. या पथकांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेला बाळासह पुणे दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना आढळले. यानंतर आरोपीता व अपहृत बाळाचा शोध घेण्यासाठी कर्जत, लोणावळा, दौंड आणि पुणे येथे पथक रवाना करण्यात आली.
कळंबोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपी रोशनी व बाळ ताब्यात; बाळ सुखरूप आईकडे सुपूर्द
पथकांनी केलेल्या तपासात आरोपीता लोणावळा येथून पनवेलकडे परत येत असल्याचे आढळले. कळंबोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके यांच्या सतर्कतेमुळे तिला कळंबोली फायर ब्रिगेडजवळ ताब्यात घेण्यात आले. अपहृत बाळाला सुरक्षितपणे तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आरोपी रोशनी विनोद वागेश्री, (वय 35,) पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टीमध्ये राहते, याला पोलीसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास पुढील कारवाईसाठी सुरु असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक यशस्वीपणे काम करत आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके (कळंबोली पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक अंकुर शेलार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.