Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार

0 0 1 6 3 3

पनवेल : मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक उलवा नोडमध्ये समिती अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. २५ जानेवारी) पार पडली.
शिवजयंतीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी या विषयावर नियोजनात्मक चर्चा झाली.
या बैठकीस समितीचे कार्यकारी सदस्य व पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, समितीचे कार्यकारी सदस्य व उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, समितीचे उपाध्यक्ष व उद्योजक जे. एम. म्हात्रे, समितीचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, विश्वनाथ कोळी, विजय घरत, वसंत म्हात्रे, संजय भगत, जयवंत देशमुख, भार्गव ठाकूर, अशोक कडू, सचिन घरत, निलेश खारकर, किशोर पाटील, स्वप्नील ठाकूर, योगिता भगत, नंदा ठाकूर, उषा देशमुख, कामिनी कोळी, कमलाकर देशमुख, गजानन घरत, वामन ठाकूर, दर्शन ठाकूर, सुजित ठाकूर, रघूनाथ देशमुख, अनुप भगत, सुदर्शन कोळी, हेमंत पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
२०१७-१८ सालापासून या मैदानावर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारणी आणि विविध कार्यक्रमे,
सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदान व्हावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२० रोजी गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुंबईच्या शिवाजी पार्क सारखे मैदान तयार व्हावे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने हे मैदान निर्माण व्हावे असा प्रस्ताव काँग्रेस नेते महेंद्र घरत यांनी मांडला आणि त्याला ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयासाठी व मैदानासाठी सिडकोने जमीन देण्याचेही कबूल केले आहे. या जमीनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २५ ते ३० कोटी रुपये खर्च करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टी तसेच मुलांना खेळण्यासाठी प्ले गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र, संमेलने, क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा, सांस्कृतिक महोत्सव व अन्य कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारे हे भव्य मैदान नागरिकांना खूप लाभदायी होणार आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या परिसरातील गावांचा विचार करत दुरदृष्टी संकल्प केला. त्याचबरोबरीने या सर्व वास्तूंचा ताबा गव्हाण ग्रामपंचायतीकडे राहणार असल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने येथील मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीने यापूर्वीच केला आहे, त्यानुसार या मैदानाचे नामकरण १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर करण्याचे या बैठकीतून जाहीर करण्यात आले.
या बैठकीत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, सन १९८१ मध्ये लोकनेते दि. बा.पाटील व जनार्दन भगतसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोपर गाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. दरवर्षी या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे त्याचप्रमाणे महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी आणि क्रीडा तसेच सार्वजनिक कार्यासाठी विकसित मैदान असावे हि सातत्याने ग्रामस्थांकडून मागणी होत होती, त्यानुसार २०१७-१८ पासून या संदर्भात पाठपुरावा सुरु झाला आणि त्यानुसार सिडकोनेही भूखंड आरक्षित केला आहे, असे सांगतानाच आपल्या सर्वाना अभिमान वाटेल असा पुतळा उभारण्याच्या दृष्टिकोनातून मी शिवाजी पार्क तसेच जासई जवळील शिवस्मारकाची पाहणी करून त्यातून काय संकल्पना घेता येईल याचा विचार केला आहे, असे नमूद करून या पवित्र कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, नव्याने झालेला अटल सेतू आणि त्याबरोबरच खारकोपर रेल्वे स्थानक लक्षात घेता या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्वरूपातील पुतळा असावा हि संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडली. सिडकोकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने या बाबतीत मॅपिंग केले व हा भूखंड आरक्षित केला. महाराजांच्या विषयी असलेला अभिमान अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी लवकरच या कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, अटल सेतू वरून प्रवास करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले पाहिजे, त्यामुळे या पुलाच्या किमान १० ते १५ फूट उंच महाराजांचा पुतळा असावा. या ठिकाणी किमान ५०० जणांची आसन व्यवस्था असलेले ऑडिटोरियम, मिनी थिएटर, ऑफिस, कॉन्फरन्स हॉल, पार्किंग, व्यूइंग गॅलरी, कॅफेटेरिया, लिफ्ट व इतर प्राथमिक सुविधा या ठिकाणी असणार असा आरखडा तयार करून त्याप्रकारे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

JITHIN SHETTY

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे