पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उलवे पोलीस ठाण्यात महिला पोलीसांचा गौरव
मराठी भाषिक एकीकरण संघटनेतर्फे सामाजिक सलोखा व पोलीसांना पाठबळ देण्याचा संकल्प

पनवेल जितिन शेट्टी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटना, उलवे यांच्या वतीने उलवे पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस विभागाचे सामाजिक योगदान लक्षात घेता संघटनेने आपल्या पोलीस बांधवांना कायम साथ देण्याची ग्वाही दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांचे संघटनेला मार्गदर्शन व शुभेच्छा
कार्यक्रमात उलवे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करताना मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषिक एकीकरण संघटनेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस हे केवळ कर्मचारी नसून आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते दिवस-रात्र कर्तव्य बजावत असल्यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो, हे संघटनेने अधोरेखित केले. या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या जीवनातील शौर्य, सामाजिक समतेसाठी केलेले प्रयत्न आणि प्रशासनातील कार्यतत्परता यावर प्रकाश टाकण्यात आला. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ‘जगातील महान स्त्रियांच्या यादीत अहिल्यादेवींचे नाव प्रथम येईल,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.